मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; आगामी दोन वर्षात सर्व ३० लाख कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण
द सोलापूर||
सोलापूर : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सोलापुरात ज्या पद्धतीने सुंदर घरे उभारून गृहनिर्माण क्षेत्रात ‘सोलापूर पॅटर्न’ तयार झाला आहे. एखाद्या खाजगी विकासकाच्या प्रकल्पालाही लाजवेल अशी घरे उभारण्यात आली आहे. सोलापूरने महाराष्ट्राला, गरजूंना कमी खर्चात दर्जेदार घरे देण्यासंदर्भात दिशा दाखवली आहे. सामान्यांसाठी घरे उभारण्याचा ‘सोलापूर पॅटर्न’ राज्याला मार्गदर्शक आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नव्याने उभारलेल्या या घरकुल प्रकल्पाचे कौतुक केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ३० लाख घरकुलांना केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे २०१८ पर्यंत प्रतिक्षा यादीतील सर्व नागरिकांना घरे देण्यात येणार आहे. देशात सर्वाधिक वेगाने घरे ग्रामविकास विभागामार्फत उभारण्यात येत आहेत. २० लाखांपेक्षा अधिक घरांचे काम सुरू करण्यात आले आहे. पुढील दोन वर्षात सर्व ३० लाख कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण होईल. २०१८ च्या यादीतून सुटलेल्या नागरिकांसाठी नव्याने नोंदणी करण्याची परवानगी मिळाल्याने त्यांनाही लवकरच केंद्र सरकारच्या माध्यमातून घरकुल मिळेल. महाराष्ट्र हे पहिले बेघरमुक्त राज्य करायचे आहे. या ३० लाख घरांना केंद्र सरकारच्या अनुदानासोबत राज्य सरकार ५० हजार रुपये देईल. प्रत्येक घरावर सौर ऊर्जेचा वापर करून त्यांना मोफत वीज उपलब्ध होईल.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात घरकुलाच्या १० लाभार्थ्यांना चावीचे वितरण करण्यात आले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे ४ लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या धनादेशाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
सोलापूर सोशल फाऊंडेशनतर्फे आयोजित होणाऱ्या सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरणही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
- ‘माझं सोलापूर, सुंदर सोलापूर’ हा संकल्प : जयकुमार गोरे
- गृहनिर्माण प्रकल्पांमुळे सोलापूर शहराच्या वैभवात भर पडली आहे. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण झाल्याचे मत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले आहे.
- या दोन्ही प्रकल्पांमुळे १३५० कुटुंबांना हक्काचे घर वाजवी किंमतीत मिळणार आहे. या प्रकल्पांतर्गत सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यापूर्वी पंधरा हजार घरांचा प्रकल्प पूर्ण करण्यात आला होता.
- शहरी आणि ग्रामीण नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्याचे शासनाचे प्रयत्न आहे. राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दहा वर्षात १० लाख २६ हजार घरे सामान्य नागरिकांना देण्यात आले. मात्र गेल्या सहा महिन्यात गरजूंसाठी ३० लाख घरकुलांना मंजूरी देण्यात आली आहे.
- सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे. समांतर जलवाहिनीमुळे शहरातील पाणी समस्या दूर होण्यास मदत झाली आहे. जलशुध्दीकरण प्रकल्पासाठी जागेची समस्या दूर झाल्याने लवकरच हा प्रकल्प पूर्ण होईल.
- शहरातील अंतर्गत वितरण व्यवस्थेसाठी ८७२ रुपयांचा आरखडा तयार करण्यात आला आहे. सोलपूर-गोवा विमानसेवाही सुरू करण्यात आली आहे.
- सोलापूर येथून मुंबई आणि पुणे विमानसेवा सुरू व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ‘माझं सोलापूर, सुंदर सोलापूर’ हा संकल्प करण्यात आला असून, शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे दिली आहे.
आमदार विजय देशमुख म्हणाले, दोन्ही गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत घरांचे काम अत्यंत चांगले झाले असून, लाभार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. सोलापूर शहरात रस्ते, आरोग्य आदी चांगल्या सुविधा उपलब्ध होत आहेत. सोलापूर शहरात मुलभूत सुविधांसोबत शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे. आगामी काळात शहराचा औद्योगिक विकासही होईल, असा विश्वास आमदार विजय देशमुख यांनी व्यक्त केला आहे. सोलापूर येथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी, येथील बेरोजगार तरुण तरुणांचे स्थलांतर थांबावेत, यासाठी सोलापूरला मोठे उद्योग देण्यात यावे, अशी मागणी आमदार विजय देशमुख यांनी केली आहे.
- प्रास्ताविकात मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गृहनिर्माण संस्थेची माहिती दिली. असंघटीत क्षेत्रातील कामगार, रिक्षाचालक, भाजी विक्रेते यांच्यासाठी या गृहप्रकल्पांतर्गत हक्काचे घर उपलब्ध होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील दहिटणे येथील राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेमध्ये ५० इमारतींतून ३२७ चौ. फुटांच्या १ हजार २०० स्वयंपूर्ण सदनिका उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
- या गृहप्रकल्पांतर्गत आतापर्यंत १ हजार १२८ सदनिकांचे काम पूर्ण झाले आहे. सोलापूर महानगर पालिकेच्या हद्दीतील शेळगी येथील श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रीय समाज महालक्ष्मी या गृहनिर्माण संस्थेअंतर्गत ८ इमारतींची उभारणी करण्यात येत आहे. यामध्ये एकूण २५२ सदनिका अत्यल्प उत्पन्न गटासाठी उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यापैकी २२० सदनिकांचे काम अद्यापपर्यंत पूर्ण झाले आहे.
- असंघटित क्षेत्रातील ८११ बांधकाम मजुरांना कामगार विभागामार्फत २ लाख रुपयांचे अतिरिक्त अनुदान प्राप्त झाले असल्याने त्यांना स्वस्तात घरकुल उपलब्ध होणार असल्याची माहिती मिलिंद शंभरकर दिली आहे.

याप्रसंगी माजी आमदार राजेंद्र राऊत, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, मुंबई इमारती दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश वाघ , पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्याधिकारी राहुल साकोरे, राष्ट्र तेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार, श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रीय समाज महालक्ष्मी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर आदी उपस्थित होते. आभार प्रदर्शन म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे यांनी केले.

